तळोजा | (प्रेरणा गावंड):पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा फेज-१, सेक्टर-२ येथील भूखंड क्र. १४१ च्या वापराबाबत सध्या प्रश्न उपस्थित झाले आहेत. सदर भूखंड रहिवासी वापरासाठी मंजूर असल्याचा दावा करत, याच ठिकाणी मदरसा-मस्जिद बांधकामासाठी देणगी संकलन केले जात असल्याचा आरोप अल्पसंख्याक नेते तथा सामाजिक कार्यकर्ते जवाद धनसे यांनी केला आहे.धनसे यांच्या म्हणण्यानुसार, उपलब्ध कागदपत्रांमध्ये सिडकोचा प्रपोजल क्र. १६२९८७४ तसेच परमिट क्रमांक CITDA/B/2026/APL/00492 यांचा उल्लेख आहे. त्यामुळे संबंधित भूखंडाचा मंजूर वापर, बांधकामास दिलेली परवानगी आणि प्रत्यक्ष सुरू असलेली कार्यवाही याबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिकृत स्पष्टता मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित बांधकामाची मान्यता, परवानगी, संस्थेची कायदेशीर नोंदणी, देणगी स्वीकारण्याचा अधिकार व त्याची कायदेशीर प्रक्रिया, सुरक्षा , पार्किंग तसेच आपत्कालीन व्यवस्थेची पूर्तता यांची तपासणी करण्याची मागणी धनसे यांनी केली आहे.या प्रकरणी सिडको, पनवेल महानगरपालिका, धर्मादाय आयुक्त कार्यालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि तळोजा पोलीस ठाणे येथे लेखी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, संबंधित भूखंड अन्य एका खासगी व्यक्तीच्या नावावर असल्याचे सांगितले जात असून, ‘मदरसा-ए-आयशा एवं मस्जिद-ए-आयशा – AL FAROOQUE EDUCATIONAL TRUST’ या नावाने देणगी स्वीकारली जात असल्याचा कथित दावा करण्यात येत आहे. त्यामुळे भूखंडाचा मालकी हक्क, धार्मिक वापरासाठी आवश्यक असलेल्या मंजुरी, ट्रस्टची नोंदणी तसेच देणगी संकलनाचा अधिकार या बाबींची अधिकृत पडताळणी होण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.या प्रकरणात संबंधित भूखंडधारक, विकासक अथवा ट्रस्ट यांची प्रतिक्रिया घेतली असता अफरोज शेख यांनी सर्व बाबी कायदेशीर व पारदर्शकतेच्या आधारावर असल्याचे म्हणणे आहे.त्यामुळे करण्यात आलेल्या कथित आरोपांची स्वतंत्र पुष्टी होण्यासाठी, संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या तपासणी व अधिकृत अहवालानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.सर्व अधिकृत मान्यता, परवानग्या आणि कायदेशीर प्रक्रियांचा आदर राखत पारदर्शकता राहावी, हाच चौकशीच्या मागणीमागील उद्देश आहे,’ असे जवाद धनसे यांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले.
0 Comments