कळंबोलीत भव्य महिला पक्षप्रवेश सोहळा; मोठ्या संख्येने महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

पनवेल/ (प्रतिनिधी):कळंबोली शहरात जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला जिल्हाप्रमुख कुंदाताई गोळे यांच्या पुढाकाराने भव्य महिला पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक नागरिक तसेच महिला वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला महानगर संघटिका अॅड. सुलक्षणा जगदाळे, शहर प्रमुख तुकाराम सरक, महिला शहर प्रमुख ज्योती पाटील तसेच पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी विराट पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जाभरित वातावरण लाभले.या सोहळ्यात कळंबोली परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश केला. महिला सक्षमीकरणासोबतच राजकीय सहभाग वाढविण्यात महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, यावर यावेळी भर देण्यात आला. पक्षविस्ताराच्या माध्यमातून महिलांना नेतृत्वाची संधी देण्याच्या उद्दिष्टाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.प्रवेश केलेल्या महिलांनी पक्षाच्या धोरणांवर आणि जनकल्याणकारी कामांवर विश्वास व्यक्त करत समाजहितासाठी कार्य करण्याची तयारी दर्शवली. 
नवीन कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता संघटना अधिक बळकट झाल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत, महिला कार्यकर्त्यांच्या वाढत्या सहभागामुळे संघटनेची ताकद अधिक दृढ होत आहे. आगामी काळात महिलांना अधिक नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील,असे स्पष्ट केले.महिला जिल्हाप्रमुख कुंदाताई गोळे यांनी महिला वर्गातील जागरूकता व संघटनेबद्दलचा वाढता विश्वास याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करत संघटनेच्या पुढील योजनांची माहिती दिली.कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व नव्या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments