पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल शहरात गरजू रुग्णांसाठी अत्यल्प दरात रुग्णोपयोगी साहित्य भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणारे केंद्र सुरू झाले आहे. सेवाभारती कोकण प्रांत ट्रस्ट यांच्या माध्यमातून पनवेल येथील डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.या उपक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महर्षी वाल्मिकी शाखा व नंदनवन शाखेतील सेवाभावी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. सेवाभारती संस्थेकडून काही प्राथमिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून, उर्वरित व्यवस्था स्वयंसेवकांनी स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांतून उभारण्यात आली आहे.या केंद्रासाठी आवश्यक जागा व प्राथमिक सहकार्य डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाकडून देण्यात आले आहे. साहित्य वाटप, नोंदवही ठेवणे तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी प्रेमळ संवाद साधण्याची जबाबदारी शाखेतील स्वयंसेवक पार पाडणार आहेत. हे केंद्र आठवड्याचे सातही दिवस सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सुरू राहणार आहे.या केंद्रामार्फत फाउलर बेड, एअर बेड, वॉटर बेड, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हील चेअर, वॉकर, कमोड चेअर, नेब्युलायझर, वॉकिंग स्टिक, विविध प्रकारचे पॉट व काही वैद्यकीय बेल्ट यांसारखे साहित्य अत्यल्प भाडे व डिपॉझिटवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. भविष्यात या साहित्यात आणखी भर घालण्याचा मानस आहे. या केंद्राचे औपचारिक उद्घाटन प्रथितयश डॉक्टर डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी कोकण प्रांत संघटक सुरेंद्र शर्मा, डायबेटोलॉजिस्ट डॉ. कीर्ती समुद्र, पनवेल नगर संघचालक राकेश फाटक तसेच सेवाभारती कोकण प्रांताचे अविनाश धाट उपस्थित होते. आपण देत असलेली सेवा व्यावसायिक नसून समाजाशी नाते जोडणारी असली पाहिजे. ही सेवा तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचली पाहिजे आणि संघाच्या निस्वार्थ सेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला पाहिजे, असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.या केंद्राचे प्रमुख म्हणून अमोल शेटे तर सहकारी म्हणून प्रकाश चांदवडकर व भुस्कुटे हे काम पाहणार आहेत. हे केंद्र सुरू करण्यासाठी संघाचे कार्यकर्ते तसेच पटवर्धन रुग्णालयातील श्री. लघाटे, प्रसन्ना खेडकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. याच कार्यक्रमात सुरेंद्र शर्मा यांनी सेवाभारतीच्या विविध सेवाकार्यांची माहिती दिली.
0 Comments