पनवेल (प्रतिनिधी) हि फक्त निवडणूक नाही तर सर्वसामान्यांचा विश्वास आहे. विजय मोठा आणि निश्चित असला तरी कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नका, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज(दि. ०२) येथे केले. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता संवाद मेळावा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, पनवेलमधील जनतेने भाजपवर नेहमीच विश्वास टाकला आहे. हा विश्वास कायम राखण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. संघटनात्मक ताकद, विकासकामांचा लेखाजोखा आणि जनतेशी थेट संवाद याच्या जोरावर पनवेलमध्ये भाजप महायुती मोठा विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांनी प्रचारात शिस्त, संयम आणि सकारात्मक भूमिका ठेवण्याचे निर्देश दिले. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा संदेश घराघरात पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गतीने काम करत आहेत. त्यामुळे गतीमान सरकारला जनतेचा पाठिंबा आहे. मतरदारांचा कौल भाजप महायुतीला आहे. पंतप्रधान मोदीजी आणि देवेंद्रजी दिवसातून सोळा सोळा तास काम करत आहेत.
भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपणही काम करत राहिले पाहिजे. बुथची सर्वात मोठी ताकद असलेला आपला पक्ष आहे. २० प्रभागात होणारी हि निवडणूक आहे. त्यामुळे बूथ रचनेतून काम करा, प्रत्येक मतदार नागरिकापर्यंत पोहचा, मोदीजी, देवेंद्रजी यांनी आणि भाजप महायुतीने केलेल्या कार्याची माहिती संवादातून द्या, असा मौलिक सल्लाही त्यांनी कार्यकर्त्याना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख कार्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर दोन दोन तास बोलू शकतात ते नेहमी आपल्या भाषणात मोदीजी देवेंद्रजींच्या कार्याचा गौरव सांगतात आणि त्यातून ते कार्यकर्त्याना चार्ज करत असतात. जगातील विद्यापीठे या ठिकाणी येऊन एज्युकेशन हब होणार आहेत आणि याचा फायदा येथील प्रत्येक नागरिकाला होणार आहे. अन्नसुरक्षापासून अनेक योजना यशस्वीपणे कार्यरत आहेत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे, त्यामुळे ते द्रष्टानेता आहेत. असे सांगून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 'तुमची आमची भाजप सर्वांची' हा गजर पुन्हा दुमदुमणार आहे, असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात म्हंटले कि, भाजपच्या कार्यकर्त्याला यशाच्या दिशेने नेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मागील निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढून ७८ पैकी ५१ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक कशी लढायची याची शिकवण दिली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा, देवेंद्रजींनी रवींद्रजींनी राज्याला ताकद दिली आहे. त्यामुळे नुकताच झालेल्या नगरपरिषद नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात जास्त नगराध्यक्ष, उमेदवार विजयी झाले. देवेंद्रजी सर्वसामान्यांचे नेतृत्व असून रविंद्रजींच्या नेतृत्वाखाली संघटन मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्याच्या विकासाचा दृष्टिकोनातून काम असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शहरात ग्रामीण भागात विकासाचा झपाटा निर्माण झाला आहे. पनवेल महापालिका निर्माणासाठी शेकापने विरोध केला पण आपण सर्वानी निर्धार केला आणि महापालिका होऊन महापालिकेच्या प्रत्येक भागात विकास सुरु झाला. २०१७ साली जनतेने कौल दिला तो विश्वास सार्थ ठरवून विकासकामे झाली, केलेल्या कामाचा संदेश घेऊन मतदारांपुढे जाणार असून पनवेल महापालिकेचा विकासाचा पुढील टप्पा अर्थात व्हिजनसुद्धा तयार आहे, असेही त्यांनी नमूद केले. अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही पण ज्यांना उमेदवारी मिळाली नाही पण पक्षाचा सन्मान राखला. एबी फॉर्मसाठी धावणारे नाही तर पक्षाने जबाबदारी दिलेले कार्यकर्ते होते, त्यामुळे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करत असून त्यांचा विश्वास महत्वाचा ठरला आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. तसेच महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय या मित्रपक्षांचे एकदिलाने सहकार्य मिळाले असल्याचे सांगून त्याबद्दलही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आभार मानले.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच माझे बंधू परेश ठाकूर यांनी आपण ही निवडणूक लढवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली होती आणि ती त्यांनी प्रत्यक्षात अंमलातही आणली. कार्यकर्ता प्रथम ही भावना त्यांनी कृतीतून दाखवून दिली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला; मात्र त्यांनी तो नम्रपणे नाकारत कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. निःस्वार्थ आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेमुळे भाऊ आणि उत्कृष्ट सहकारी म्हणून मला परेश ठाकूर यांचा मनापासून अभिमान आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मेळाव्याचे प्रास्ताविक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले.यावेळी निवडणुकीत बिनविरोध झालेले नितीन पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार झाला. या मेळाव्याला कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, उपाध्यक्ष गणेश कडू, प्रल्हाद केणी, राजेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 Comments