पनवेल (प्रतिनिधी) पंजाब येथे नुकत्याच पार पडलेल्या १६ व्या नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधीत्व करत उज्ज्वल कामगिरी करून रजत पदक जिंकण्याचा मान पनवेल तालुक्यामधील केवाळे गावातील कु. रोणाल महेश पाटील याने मिळवला असून त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार त्याचा करण्यात आला.रोणाल हा युनाइटेड शोटोकान कराटे असोसिएशन इंडिया (निलेश फाईटर ) या अकॅडेमीमध्ये प्रशिक्षक योगेश बैकर यांच्याकडून बॉक्सिंगचे धडे घेत आहे. अमृतसर येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील अनेक राज्यांमधून उत्कृष्ट खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ३० किलो वजनावरील गटात झालेल्या या स्पर्धेत तीव्र स्पर्धा आणि कडव्या सामन्यांमध्ये रोणालने दाखवलेली जिद्द, कौशल्य आणि अचूक तंत्र यामुळे त्याने रौप्यपदकाची कमाई करत पनवेल तालुक्याचा मान उंचावला.रोणालची मेहनत, चिकाटी आणि क्रीडाप्रती असलेली निष्ठा प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश पनवेलसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या कामगिरीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोणालच्या कामगिरीचे कौतुक करून त्याला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments