पनवेल (प्रतिनिधी) : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेला सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण सुरुवात झाली. २२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील तब्बल ४२२ स्पर्धक सहभागी झाले आहेत.स्पर्धेचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी संचालक आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच मुंबई शहर झोन-१ चे उपाध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांनी उपस्थित खेळाडूंचे मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत उत्कृष्ट खेळभावना जपून स्पर्धा खेळण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाला मुंबई शहर झोन-१ सचिव डॉ. मनोज वर्मा, मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सचिव डॉ. व्ही. बी. नाईक, मुंबई उपनगर सचिव डॉ. निलम पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या आयोजनाचे कौतुक करत स्पर्धेच्या माध्यमातून तरुणाईत खेळ संस्कृती अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर, प्रा. प्रतिज्ञा पाटील यांच्यासह जिमखाना विभागातील सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.स्पर्धेत विविध वयोगटातील आणि वजन गटातील सामने सलगपणे पार पडत असून खेळाडूंमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.सीकेटी महाविद्यालयात दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये बॉक्सिंग स्पर्धा ही विशेष उत्साहाने पार पडणारी स्पर्धा असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.
0 Comments