पनवेल/प्रतिनिधी : पनवेल शहरातील दुरवस्थेतील रस्त्यांच्या दुरुस्तीला अखेर सुरूवात झाली आहे. भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांनी पालिकेकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जुने आदर्श हॉटेल ते बांठीया बंगला दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून पृष्ठभागीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या कामाच्या प्रारंभी सुमित दसवते, साहील मोरे, गौरव सावंत यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पावसाचे आगमन वेळेआधी झाले असले, तरी पावसाचा जोर कमी न झाल्याने डांबरीकरणाच्या कामात अडथळे येत होते. या संदर्भात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही पालिका प्रशासनाशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांनी पालिका अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत रस्त्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा ठामपणे मांडला. त्यानंतर संबंधित विभागाने तातडीने काम सुरू केले असून येत्या काही दिवसांत संपूर्ण मार्गाचे पृष्ठभागीकरण पूर्ण होणार असल्याचे कळते.या कार्यवाहीमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत भाजपचे केदार भगत यांचे आभार मानले आहेत.
0 Comments