सर्वधर्मीयांना सोबत घेऊन राजकीय पर्व सुरू करण्याचा निर्धार; खालापूर तालुक्याची संघटनात्मक धुरा डॉ. शेख यांच्याकडे सोपविण्याचे जिल्हाध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांचे संकेत

खालापूर |(साबीर शेख):सर्वसामान्यांच्या न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी तसेच संविधानिक मूल्यांच्या आधारे लोकशाही अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने AIMIM पक्षाने रायगड जिल्ह्यात संघटनात्मक विस्तारावर भर दिला आहे. जिल्हाध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांच नेतृत्वाखाली आयोजित जिल्हा दौऱ्यात सर्वधर्मीय नागरिकांना सोबत घेऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या दौऱ्याच्या निमित्ताने खालापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. शम्सी शेख यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या कुटुंबाकडून सुरू असलेल्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेण्यात आली.आगामी काळात खालापूर तालुक्याची संघटनात्मक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्याचे संकेत जिल्हाध्यक्षांनी दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त करत रायगड जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. खोपोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विविध समाजघटकांशी संवाद साधत स्थानिक नागरिकांच्या समस्या, भौगोलिक परिस्थिती तसेच शेती, रोजगार, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी युवा आणि अनुभवी नेतृत्वांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यावर यावेळी भर देण्यात आला.यावेळी बोलताना रायगड जिल्हाध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी राजकारणातील घराणेशाही आणि हुकूमशाहीच्या प्रवृत्तींवर भाष्य केले. सर्वसामान्य नागरिकांना राजकीय व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.“राजकारणातील घराणेशाही मोडून सर्वसामान्य जनतेला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पक्षाने माझ्यासारख्या मराठा समाजातील शिक्षकाच्या मुलाला जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. राजकीय चित्र बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.AIMIMचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्रातील पक्षनेते इम्तियाज जलील यांच्या नियोजनानुसार पक्ष संघटनात्मक विस्तारासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खालापूर तालुक्यात डॉ. शम्सी शेख यांच्याकडे युवकांसाठी आदर्श नेतृत्व म्हणून पाहिले जाते. त्यांच्या कुटुंबाकडून सातत्याने सुरू असलेले सामाजिक कार्य आणि अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या सामाजिक कार्याचा उपयोग भविष्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी होऊ शकतो, असा विश्वास जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला. आगामी काळात खालापूर तालुक्यातील AIMIM संघटनेची जबाबदारी डॉ. शम्सी शेख यांच्याकडे सोपविण्याचे संकेत देत त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिकांनी पक्षात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.त्यामुळे खालापूर तालुक्यात AIMIMची संघटनात्मक बांधणी कोणत्या दिशेने पुढे जाणार आणि डॉ. शम्सी शेख यांच्याकडे प्रत्यक्षात कोणती जबाबदारी सोपविली जाणार, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, सरकारी योजना, मुद्रा कर्ज योजना, शिष्यवृत्ती आणि नागरिकांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्यावर पक्षाने भर देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच SIR प्रक्रियेच्या उद्दिष्टांबाबत पक्षाची भूमिका मांडून पारदर्शक लोकशाहीसाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणीला व्यापक स्वरूप देऊन पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी व्यक्त केला.रायगड जिल्ह्यासह संपूर्ण देशात सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून संघटना मजबूत करण्यासाठी युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवले जाईल. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवश्यक ते संघटनात्मक पाठबळ दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या जिल्हा दौऱ्यात जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष शहानवाज शेख, फैज पारकर, सिद्धीक मुल्ला, हजरत मेहराज, अलीम शेख, हजरत सलमान, रमजान शेख, जाकीर सय्यद, जाकीर बस्तवी, शबिना शेख, तबस्सुम शेख आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वधर्मीय समाजघटकांना सोबत घेऊन पक्षाचा संघटनात्मक विस्तार करण्याचा संदेश या दौऱ्यातून देण्यात आला.डॉ. शम्सी शेख यांच्या सामाजिक कार्याला पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराची जोड मिळाल्यास खालापूर तालुक्यात AIMIMला नवी दिशा मिळू शकते. मात्र, तालुक्याची अधिकृत जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्याबाबत पक्षाकडून औपचारिक घोषणा होणे अपेक्षित आहे. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक वाटचाल कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments