पनवेल (प्रतिनिधी): पनवेल तालुक्यातील वाढत्या घनकचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे निवेदनाद्वारे केली आहे. पनवेल परिसरातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कचरा व्यवस्थापनाची समस्या तीव्र होऊ नये या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना दिलेल्या निवेदनात तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले आहे कि, पनवेल तालुक्यातील एकूण ७१ ग्रामपंचायतीपैकी १० पेक्षा जास्त ग्रामपंचायती या सिडको अधिसूचित क्षेत्रात व ४० पेक्षा जास्त ग्रामपंचायती नैना अधिसूचित क्षेत्रात आहेत. नियोजन प्राधिकरणामार्फत विविध बांधकामांना परवानगी देते वेळेस विकास शुल्काची आकारणी करण्यात येते. तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनची खात्री केल्यानंतरच भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. सिडको व नैना या नियोजन प्राधिकारणाकडील विविध विकास कामांमूळे अधिसूचित क्षेत्रातील निवासी, औद्योगिक व वाणिज्यक आस्थापनांची मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. अधिसुचित क्षेत्रातील वाढत्या विकास कामांमुळे पर्यायाने नागरी लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तसेच, दैनंदिन रोजगारासाठी स्थलांतरित होणारी संख्या ही जास्त आहे. त्यामुळे अधिसुचित क्षेत्रातील निवासी, वाणिज्यक, व औदयागिक आस्थापनांकडून होणारी कचरा निर्मिती ही प्रचंड आहे. सबब, अधिसुचित क्षेत्रातील ग्रामीण हद्दीमध्ये कच-याचे व्यवस्थापन करणे ही अत्यंत गरजेची बाब झाली आहे. सदयस्थितीत ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत कचरा व्यवस्थापन हातळले जात आहे. परंतु, ग्रामपंचायती मार्फत होणारे कचरा व्यवस्थापन हे पुरेशा आर्थिक तरतुदी व संसाधनाअभावी आदर्श कचरा व्यवस्थापन होत नसल्याचे यापुर्वी वारंवार निदर्शनास आलेले आहे. सध्या ग्रामपंचायती मार्फत ग्रामीण हद्दीतील कच-याचे संकलन केले जात आहे. तथापि, शास्त्रीयदृष्टया कच-यावर प्रक्रिया केली जात नाही. तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे व चालवणे याकरिता ग्रामपंचायतीकडे आवश्यक निधी, मनुष्यबळ साधन सामुग्री व तांत्रिक सुविधा यांची कमतरता आहे. तरी, पनवेल ग्रामीण हद्दीत्तील सिडको- नैना अधिसुचित क्षेत्रात निर्माण होणारा कचरा, सिडकोकडील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्फत प्रक्रिया करणेच आवश्यक आहे. परंतु, सदर कचरा व्यवस्थापना करिता लागणारा प्रक्रिया खर्च देण्यास ग्रामपंचायती सक्षम नाहीत, तसेच, कचरा निर्मिती ते सिडको कडील सदयास्थितीतील कार्यरत कचरा प्रक्रिया केंद्र या करिताही येणारा वाहतुक खर्च मोठ्या प्रमाणात येणार आहे व याकरिता ग्रामपंचायतीकडे पुरेशी आर्थिक तरतूद नाही. सबब ग्रामपंचायती मार्फत जमा होणा-या कच-याचे आदर्श व्यवस्थापन करण्याकरिता, सिडको मार्फत ग्रामपंचायती सोबत उचित करार केल्यास तसेच येणारा प्रक्रिया खर्च माफ केल्यास ग्रामपंचायत हद्दीत घनकचरा व्यवस्थापन करणे शक्य होईल. म्हणून पनवेल ग्रामीण हद्दीतील सिडको नैना अधिसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या प्रस्तावांचा सकारात्मक विचार करुन त्यांचे कचरा व्यवस्थापन सिडको यंत्रणेमार्फत करुन देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
0 Comments