पनवेल,(प्रतिनिधी)दि. १२ : कामोठे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, जय महाकाली देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्यासह शेकडो नागरिकांनी पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी अनंत गीते यांनी भाजपच्या राजकारणावर टीका करत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सत्तेला युवा पिढी आव्हान देईल, असा दावा केला.कामोठ्यातील या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. गोपीनाथ भगत हे माजी नगरसेवक तसेच प्रभाग समिती ‘क’चे माजी सभापती आहेत, तर सचिन गायकवाड हे जय महाकाली देवालय ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रवेशासोबत शेकडो नागरिकांनी ठाकरे गटात सहभाग घेतल्याने पक्षाने स्थानिक पातळीवर संघटनवाढीवर भर दिल्याचे दिसून आले.दरम्यान, पनवेल परिसरातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत बबनदादा पाटील यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली. ऑक्टोबर महिन्यातही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणीसमस्येवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दसऱ्यानंतर पनवेल महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.या सोहळ्याला मावळ लोकसभा संपर्कप्रमुख तथा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख समाधान काशीद, नगरसेविका मेघना घाडगे, रितिक्षा गोवारी, प्रिया गोवारी यांच्यासह रामदास गवारी, प्रवीण जाधव, विश्वास पेटकर, सुनील गोवारी, कामोठे शहर संघटिका संगीता राऊत, सुवर्णा वाळुंज, धनश्री राठोड, कामगार नेते अविनाश मोरे आणि आरोग्य सेनेचे डॉ. आशिष बांदेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षप्रवेश सोहळा आणि पाणीटंचाईवरून जाहीर करण्यात आलेल्या मोर्चामुळे कामोठे व पनवेल परिसरातील राजकीय वातावरणात या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे.
0 Comments