मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या नाटकाच्या संहितेचे पूजनही माझ्या हस्ते झाले होते आणि त्या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत दोन पुरस्कार मिळवले होते. त्यामुळे त्या नाटकाच्या यशस्वी वाटचालीच्या आठवणी आजही कायम आहेत. यंदाच्या ‘ही परी अस्मानीची’ या नाटकाकडून आणि त्यातील कलाकारांकडून त्याहून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, असे रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. रंगभूमी ही समाजमनाशी संवाद साधणारे प्रभावी माध्यम असून, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न आणि घडामोडी मांडणाऱ्या पत्रकारांनी सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविणे ही कौतुकाची बाब असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले. नाटकाच्या माध्यमातून कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळते. राज्य नाट्य स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर मुंबई मराठी पत्रकार संघाने आपले नाटक सादर करावे, ही आनंदाची बाब आहे, असे सांगत या नाटकातील सर्व कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा, दिल्या. पत्रकारिता आणि सांस्कृतिक चळवळ यांची सांगड घालत मुंबई मराठी पत्रकार संघ विविध उपक्रम राबवत असल्याचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. ‘‘राज्य नाट्य स्पर्धेतील मुंबई मराठी पत्रकार संघाचे हे दुसरे नाटक आहे. पहिल्या नाटकाला मिळालेल्या यशाची परंपरा कायम राखत ‘ही परी अस्मानीची’ हे नाटकही सर्व कलाकार तितक्याच ताकदीने सादर करतील, असा विश्वास आहे,’’ असे चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
0 Comments