नृत्य स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी, नृत्याविष्काराची संकल्पना, सराव, मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची जबाबदारी विशेष शिक्षिका स्मिता निळकंठ यांनी सांभाळली. विशेष विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार नृत्याचे प्रशिक्षण देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी महिनाभर अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीला आणि योग्य मार्गदर्शनाला यश मिळत NIEPID RC NM ने नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.त्याचप्रमाणे संगीत शिक्षिका मीना दासमोहपात्रा यांनी विद्यार्थ्यांची संगीताची उत्तम तयारी करून घेतली. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार सराव घेत त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन दिल्यामुळे संगीत स्पर्धेतही NIEPID RC NM ला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळाली. या उल्लेखनीय यशाबद्दल NIEPID RC NM नवी मुंबईचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. तसेच स्मिता निळकंठ मॅडम आणि मीना दासमोहपात्रा मॅडम यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. विशेष विद्यार्थ्यांना नृत्य आणि संगीताचे प्रशिक्षण देणे हे निश्चितच आव्हानात्मक कार्य आहे. मात्र योग्य नियोजन, सातत्यपूर्ण सराव, संयम, प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला, तर ही मुलेही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या दोन्ही स्पर्धांतील प्रथम क्रमांकाचे श्रेय विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि NIEPID RC NM खारघरच्या संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांना जाते. डॉ. रवी प्रकाश सिंह यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
0 Comments