करंजा बंदराच्या विकासाला मिळणार मोठी चालना! १८० कोटींच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांचा सविस्तर आढावा; पुढील तीन महिन्यांत कामांना सुरुवात मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्राधान्य! – आमदार महेश बालदी

पनवेल (प्रतिनिधी) : उरण विधानसभा मतदारसंघातील करंजा परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. परिसरातील विविध विकासकामांसाठी तब्बल १८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, या कामांना पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. विकासकामांचे नियोजन आणि अंमलबजावणीबाबत करंजा सोसायटी येथे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.बैठकीस मत्स्यपालन विभागाचे अधिकारी, करंजा सोसायटीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव उपस्थित होते. यावेळी करंजा परिसरातील प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेतानाच स्थानिक नागरिकांच्या समस्या, मागण्या आणि सूचनाही जाणून घेण्यात आल्या.मच्छीमारी व्यवसायाशी करंजा परिसराचा जवळचा संबंध असल्याने मच्छीमार बांधवांच्या व्यवसायातील अडचणी, दैनंदिन गरजा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा विचार करून विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मंजूर निधीचा योग्य वापर करून त्याचा थेट लाभ स्थानिक नागरिकांना मिळावा, यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.१८० कोटी रुपयांच्या निधीतून प्रस्तावित कामांची प्रक्रिया सुरू असून, पुढील तीन महिन्यांत कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
विकासकामे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.“मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्राधान्य आहे. करंजा परिसराच्या विकासासाठी १८० कोटी रुपयांच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जात आहेत. ही कामे केवळ कागदावर न राहता वेळेत प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.या बैठकीमुळे करंजा परिसरातील विकासकामांच्या अंमलबजावणीला दिशा मिळाली असून, स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.बैठकीस जयविंद्र कोळी, नारायण नाखवा, राजेश नाखवा, भारत नाखवा, सागर नाखवा, शिवदास कोळी यांच्यासह करंजा सोसायटीचे पदाधिकारी, मच्छीमार बांधव, मत्स्यपालन विभागाचे अधिकारी आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments