पनवेल(प्रतिनिधी )दि. ८ :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते अधिक सुस्थितीत व सुरक्षित राहावेत, यासाठी महापौर नितिन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार महापालिका कार्यक्षेत्रातील विविध भागात रस्ते दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहेत. गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून रस्ते दुरूस्तीची कामे वेगाने हाती घेण्यात आली आहेत.यासाठी यामध्ये कळंबोली येथील सेक्टर-३ मधील रोड क्रमांक १, हनुमान मंदिर ते केएलई कॉलेज मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच गणेश घाट, पापडीपाडा परिसरासह रोड क्रमांक १९ व इतर प्रमुख रस्त्यांवरही खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे.
गणेशोत्सव काळात शहरातील विविध भागांत नागरिकांची तसेच गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. त्याअनुषंगाने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत व्हावा, यासाठी महापालिकेच्या संबंधित यंत्रणांकडून रस्त्यांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याचे शहर अभियंता राजेश कर्डिले यांनी सांगितले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबरोबरच आवश्यकतेनुसार काँक्रिटीकरण करून रस्त्यांची गुणवत्ता व टिकाऊपणा सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही सुरू आहे.नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि खड्डेमुक्त प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांत रस्ते दुरुस्तीची कामे सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत.
0 Comments