पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम

पनवेल (प्रतिनिधी ): वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांसह इतर वाहनचालकांविरोधात पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पनवेल शहर वाहतूक शाखेकडून एकूण १,३२० कारवाया करण्यात आल्या असून, त्यातून ९ लाख ५० हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) वतीने एकूण ४२ कारवाया करण्यात आल्या असून, या कारवाईदरम्यान ३ लाख ८४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाहतूक शाखा आणि आरटीओच्या कारवाईत एकूण १३ लाख ३४ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.पनवेल शहरातील वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात पनवेल शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी संयुक्त विशेष रिक्षा कारवाई करण्यात आली. नवीन पनवेल रेल्वे स्टेशन, एचडीएफसी तसेच आदई सर्कल आणि माथेरान रोड परिसरात सकाळी ७ ते ११.३० वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पनवेल शहर वाहतूक शाखा तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अनिल गेळे, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.या कारवाई दरम्यान रिक्षामध्ये अनधिकृतपणे फ्रंट सीट बसविणे, गणवेश न घालणे, मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणे, काळ्या काचा, विना हेल्मेट वाहन चालविणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.या संयुक्त कारवाई दरम्यान पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान, पनवेल शहरातील सर्व रिक्षाचालकांनी प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा लक्षात घेऊन वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, गणवेश परिधान करावा आणि मीटरप्रमाणे भाडे आकारावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच नागरिक आणि वाहनचालकांनी वाहतूक शिस्त राखण्यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, सिग्नल जंप करू नये, वेगमर्यादेचे पालन करावे आणि चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्टचा वापर करावा. तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.वाहतुकीचे नियम केवळ दंड टाळण्यासाठी नसून प्रत्येकाच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments