काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

पनवेल | (प्रतिनिधी):मतदारांचा मतदानाचा अधिकार, मतदार याद्यांमधील पारदर्शकता आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास या मुद्द्यांवर काँग्रेसने देशव्यापी आंदोलन पुकारले. त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे आणि रायगड दक्षिण जिल्हाध्यक्ष राजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच विविध आघाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.मतदार याद्यांमधील बदल, मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. मतदाराला त्याच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व उत्तरदायी असावी,अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती म्हात्रे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. प्रत्येक निवडणुकीत भाजपला फायदा होईल असे निर्णय घेतल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांना अटक करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली.
आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मतदाता बचाव, लोकतंत्र बचाव’, ‘लोकतंत्र जिंदाबाद’, ‘आपले मत, आपला अधिकार’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ‘EVM हटाव’ तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करणारे फलकही आंदोलकांच्या हातात होते. संविधानिक मूल्यांचे संरक्षण, नागरिकांचा मतदानाचा अधिकार आणि लोकशाही संस्थांची स्वायत्तता यांचा संदेश देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे बॅनरही आंदोलनात पाहायला मिळाले.दरम्यान, मतदार यादीतील बदल आणि निवडणूक प्रक्रियेबाबत काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक चौकशी व कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.या आंदोलनात डॉ. श्रुती शाम म्हात्रे, राजा ठाकूर, मिलिंद पाडगावकर, नंदा म्हात्रे, श्रद्धा ठाकूर, शंभू म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक लतीफ शेख, माजी नगरसेविका शशिकला सिंग, विजय केणी, लतीफ नलकांडे, अरविंद सोनटक्के, जयवंत देशमुख, मुनावर देशमुख, चेतन म्हात्रे, विलास म्हात्रे, अमित दवे, प्रदीप सुंके, बबन केणी, अमिना खान, महेनूर खान, झीनत मालदार, अलसाबा खान, हलिमा खान, अय्या खान, असरार खान, आसिफ मालदार, फरजाना खान, खैरुन्निसा शेख, निखत खान यांच्यासह जिल्हा, तालुका, शहर आणि गाव पातळीवरील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Post a Comment

0 Comments