पनवेल | (प्रेरणा गावंड):पनवेल महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेत्या लीना अर्जुन गरड यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्तांना पत्र देत संपूर्ण कामांचे तातडीने प्रत्यक्ष स्थळपाहणीसह ऑडिट करण्याची मागणी केली आहे.महासभेत ७७ कृत्रिम आणि २७ नैसर्गिक विसर्जन तलावांच्या व्यवस्थेसाठी सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचा दावा गरड यांनी केला आहे. एका कृत्रिम तलावासाठी सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचे टेंडर असताना, प्रत्यक्ष पाहणीत अपेक्षित सुविधांच्या तुलनेत केवळ १० ते २० टक्केच काम झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
करदात्यांच्या पैशांचा योग्य विनियोग झाला आहे की नाही, याची वस्तुनिष्ठ तपासणी होणे आवश्यक असल्याचे गरड यांनी म्हटले आहे. २४ आणि २५ सप्टेंबर रोजी पालिका अभियंत्यांच्या उपस्थितीत स्थानिक पंचांसमवेत सर्व तलावांची ऑडिओ-व्हिडिओ नोंद करून प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारांची बिले रोखून त्यांना काळ्या यादीत टाकावे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, निधीचा अपहार किंवा गैरव्यवहार झाल्याचा आरोप तपासणीतून स्पष्ट होणे आवश्यक असून, पालिका प्रशासनाची भूमिका या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे.
0 Comments