कोन ग्रामपंचायत उपसरपंचपदी साहिल म्हात्रे यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी (पनवेल):कोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साहिल म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच निकिता घरत यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी झालेल्या विशेष सभेत साहिल म्हात्रे यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.निवडीनंतर भाजप नेते प्रितम म्हात्रे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच साहिल म्हात्रे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, "कोन ग्रामपंचायतीने अनेक वर्षांपासून तरुणांना आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याची परंपरा जपली आहे. साहिल म्हात्रे यांच्या रूपाने एक सहकारी उपसरपंचपदी विराजमान झाला, याचा आनंद आहे. 
सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ समाजसेवा व गावाच्या विकासाच्या उद्देशाने एकत्रितपणे काम करत आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर द्यावा. विरोधकांकडूनही चांगल्या सूचना आल्यास त्यांनाही सोबत घेऊन विकासाची वाटचाल करावी.नवनिर्वाचित उपसरपंच साहिल म्हात्रे म्हणाले, एवढ्या लहान वयात ग्रामपंचायत समिती, सरपंच आणि सर्व सदस्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे आणि गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणे हेच माझे प्रमुख ध्येय असेल.
या कामात मला मार्गदर्शन करणारे जितेश शिसवे,अतुल घरत, अक्षय घरत, नितीन म्हात्रे तसेच वेळात वेळ काढून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले प्रितम दादा म्हात्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत राहील, असा विश्वास आहे.यावेळी कोन ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, महिला भगिनी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. साहिल म्हात्रे यांच्या बिनविरोध निवडीमुळे कोन परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments