पनवेल, दि. २ जुलै : आषाढी वारी पालखी सोहळा २०२६ निमित्त पनवेल महानगरपालिका आणि धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फॉर सोशियो-हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन (दोस्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अवयवदान व आरोग्य सेवा दिंडीचा प्रस्थान सोहळा तसेच ‘दोस्त दिंडी पुरस्कार’ वितरण सोहळा गुरुवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास महापौर नितीन पाटील, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महापालिका सदस्य अजय बहिरा, सुमित झुंजारराव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी के. सी. लुथिया, डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. गुस्ताद डावर आणि विजय कासुर्डे यांचा ‘दोस्त दिंडी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात अवयवदान संकल्प कार्ड आणि अवयवदान माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी अवयवदानाचे महत्त्व, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी यावर मार्गदर्शन करत अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.ह.भ.प. रामदास महाराज मोरे यांनी वारीची परंपरा आणि भारतीय संस्कृतीतील दानाचे महत्त्व अधोरेखित करत, एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते, असे सांगितले.कार्यक्रमात दोस्त कला मंच व नृत्य नवरसा अकॅडमी यांच्या वतीने भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अवयवदानावर आधारित लघुनाटिकेद्वारे जनजागृती केली. तसेच अवयवदान चळवळीत योगदान देणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.यानंतर महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून अवयवदान व आरोग्य जनजागृती दिंडीला प्रस्थान देण्यात आले. ही दिंडी ९ जुलैपासून पालखी सोहळ्यात सहभागी होणार असून, अवयवदान जनजागृतीसोबत यकृत आजार तपासणीसाठी फायब्रोस्कॅन शिबिरे तसेच पालखी मार्गावरील शहरांमध्ये नॉन-ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर्स सक्षम करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कोट :
"अवयवदानाबाबत समाजातील अंधश्रद्धा आणि अज्ञान दूर करणे ही काळाची गरज आहे. अवयवदान ही अनेकांना नवजीवन देणारी मानवतावादी कृती आहे. मी स्वतः देहदानाचा संकल्प केला असून, प्रत्येक नागरिकानेही समाजहितासाठी अवयवदानाचा संकल्प करावा," असे महापौर नितीन पाटील यांनी सांगितले.
0 Comments