पनवेल,दि.२३ : पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे आयोजित ‘मोदक व पुरणपोळी महोत्सव–२०२६’ला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या उपमहापौर प्रमिला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममताताई प्रितम म्हात्रे होत्या. या महोत्सवाला महिला उद्योजिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.या महोत्सवात सुमारे ५० महिला गृहउद्योजिकांनी सहभाग घेत विविध प्रकारचे मोदक, पुरणपोळ्या तसेच घरगुती उत्पादनांचे स्टॉल्स उभारले.
महोत्सवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी कधीही घराबाहेर पडून स्वतंत्रपणे व्यवसाय न केलेल्या अनेक महिलांनी प्रथमच स्वतःचा स्टॉल लावून व्यवसाय करण्याची संधी मिळाली. ग्राहकांशी थेट संवाद साधणे, स्वतःच्या उत्पादनांची विक्री करणे आणि भविष्यातील ऑर्डर्स मिळविणे, हा अनुभव या महिलांचा आत्मविश्वास वाढविणारा ठरला.सहभागी महिला उद्योजिकांनी या संधीबद्दल पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचे आभार व्यक्त केले. महिलांच्या कौशल्याला व्यावसायिक स्वरूप देऊन त्यांना स्वावलंबनाकडे नेण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबविण्याचा पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी सभापती ममताताई प्रितम म्हात्रे यांचे विशेष आभार मानले.महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मोदक–पुरणपोळी महोत्सवाचा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिला उद्योजकींना नक्कीच उपयोग होणार आहे. या महोत्सवास महिला व बालकल्याण विभाग प्रमुख कविता मोकल व डेएनयुएलएम विभागाच्या व्यवस्थापक विन्या म्हात्रे यांचे सहकार्य लाभले.
*कोट*
“महिला व बालकल्याण या विभागाच्या प्रमुख ‘महिला’ आणि ‘बालक’ या दोन्ही घटकांना एकाच व्यासपीठावर संधी मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे. गृहीणींच्या कौशल्याला व्यवसायाची जोड मिळावी आणि विशेष मुलांच्या कलागुणांना समाजाकडून प्रोत्साहन मिळावे, यासाठी यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”
ममताताई प्रितम म्हात्रे
सभापती
महिला व बालकल्याण समिती
चौकट
या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे स्पेशल चाइल्ड मुलांनी स्वतःच्या कलागुणांतून तयार केलेल्या राख्यांचे विक्री केंद्र. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देतानाच विशेष मुलांच्या कलागुणांनाही हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हे केंद्र उभारण्यात आले होते. उपस्थित महिला, स्टॉलधारक आणि ग्राहकांनी या मुलांनी तयार केलेल्या राख्या खरेदी करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सभापती सौ. ममताताई प्रितम म्हात्रे यांनी महोत्सवादरम्यान सातत्याने केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
0 Comments