तांबाटी ग्रामपंचायतीचा करभरणा प्रोत्साहन उपक्रम; २० जुलैला लकी ड्रॉ

खालापूर /(प्रतिनिधी) : ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी (ता. खालापूर) यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या करभरणा प्रोत्साहन उपक्रमाअंतर्गत लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम सोमवार, २० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात घरपट्टी व इतर ग्रामपंचायत करांची वेळेत वसुली व्हावी, तसेच नागरिकांमध्ये करभरणेबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमास परिसरातील विविध कंपन्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून सहकार्य करत आकर्षक भेटवस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.
३१ मार्च २०२६ पर्यंत ग्रामपंचायतीचे कर भरलेल्या करदात्यांना लकी ड्रॉ कूपन देण्यात आले होते. या कूपनधारकांची पारदर्शक पद्धतीने सोडत काढून विजेत्या करदात्यांना विविध आकर्षक भेटवस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास ग्रामस्थांसह पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम व सरपंच अविनाश आमले यांनी केले आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वेळेत करभरणा करण्याची सवय वाढून ग्रामविकासाला चालना मिळेल, असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments