ग्रामसेवक प्रशांत कदम यांच्याकडून माणुसकीचे दर्शन; आदिवासी महिलेला व चार महिन्यांच्या चिमुकल्याला दिला आधार

खालापूर | (प्रतिनिधी): खालापूर तालुक्यातील तांबटी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत कदम यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे एका आदिवासी महिलेला आणि तिच्या अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले. त्यांच्या या संवेदनशील आणि सामाजिक जाणिवेतून केलेल्या कृतीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.प्रशांत कदम हे एका कामानिमित्त जात असताना रस्त्याच्या कडेला एक आदिवासी महिला आपल्या चार महिन्यांच्या बाळाला घेऊन व्याकूळ अवस्थेत रडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बाळ सलग दोन तासांपासून रडत असल्याने महिला घाबरली होती. मदतीसाठी अनेक वाहनांना हात करूनही कोणीही थांबले नव्हते.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कदम यांनी तात्काळ वाहन थांबवून महिलेची विचारपूस केली. तिच्या पतीशी संपर्क साधला असता तो मजुरीच्या कामावर असल्याने त्वरित येणे शक्य नसल्याचे समजले. यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता आई व बाळाला स्वतःच्या वाहनातून चौक येथील बालरोगतज्ज्ञांकडे नेले.डॉक्टरांनी तपासणी करून तातडीने उपचार सुरू केले. औषधोपचारानंतर काही वेळातच सतत रडणारे बाळ हसू लागले. हे पाहून आईलाही मोठा दिलासा मिळाला. उपचारानंतर प्रशांत कदम यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे घेऊन आई व बाळाला सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविले.दरम्यान, महिलेचा पती आल्यानंतर त्याने उपचारासाठी झालेला खर्च देण्याचा आग्रह धरला. मात्र, प्रशांत कदम यांनी कोणतेही पैसे घेण्यास नकार देत, "गरजेच्या वेळी माणसाने माणसाच्या मदतीला धावून जाणे हेच सर्वात मोठे समाधान आहे," अशी भावना व्यक्त केली.या माणुसकीपूर्ण कृतीबद्दल संबंधित कुटुंबाने ग्रामसेवक प्रशांत कदम यांचे मनापासून आभार मानले असून, त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि संवेदनशीलतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments