पनवेल महानगरपालिकेतर्फे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यवसाय मार्गदर्शनपर बैठक

पनवेल, दि. १७ : पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (डेएनयूएलएम) अंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यवसाय मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले. महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस बचत गटांतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.यावेळी मार्गदर्शन करताना ममता म्हात्रे यांनी महिला व बालकल्याण समितीमार्फत सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध योजनांची माहिती दिली. महिलांना विविध प्रकारचे कौशल्यविकास प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी बहुउद्देशीय केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिलांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा व मागण्या जाणून घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
बैठकीत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील बचत गटांच्या महिलांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच उपजीविकेची शाश्वत साधने निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.यावेळी महिलांना स्वयंरोजगार, लघुउद्योग, बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, उद्योग उभारणी तसेच शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती डेएनयुएलएम व्यवस्थापक विनया म्हात्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.
चौकट :
"महिलांनी पारंपरिक व्यवसायाबरोबरच आधुनिक बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायाची निवड करावी. तसेच खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छतेचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे."
— ममता म्हात्रे, सभापती, महिला व बालकल्याण समिती, पनवेल महानगरपालिका

Post a Comment

0 Comments