पनवेल (प्रतिनिधी) :अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागामार्फत यूएनडीपी (UNDP) योजनेअंतर्गत भात बियाण्यांचे वाटप, अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तूर बियाण्यांचे वितरण तसेच गोकृपा अमृतचे विरजण वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हा परिषद सदस्या अनन्या गाताडे, सरपंच मिनाक्षी जगताप आणि पोसरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बंडू शिद यांच्या हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमास सेंद्रिय शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी मिनेश गाडगीळ तसेच प्रगतशील शेतकरी शांताराम मालूसरे, सुजित पाटील, जगदीश म्हसकर, संतोष भोसले आणि कैलास मालूसरे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रास्ताविक करून कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांची माहिती देऊन आधुनिक व शाश्वत शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
यावेळी अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी गुळसुंदे येथील शेतकरी प्रमोद विधवांस यांच्या शेताला भेट देऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) फळबाग लागवड तसेच भात रोपवाटिकेची पाहणी केली व त्याबाबत माहिती घेतली.कार्यक्रमात सेंद्रिय शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी मिनेश गाडगीळ आणि प्रगतशील शेतकरी सुजित पाटील यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती, सेंद्रिय शेती आणि उत्पादनवाढीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.यावेळी जानू भिकू गोठळ यांनी आकुळवाडी गावात राबविण्यात आलेल्या बांधबंदिस्तीच्या कामांमुळे तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गावातील भातशेती क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, तालुका कृषी अधिकारी भगवान हेगडे आणि सहाय्यक कृषी अधिकारी प्रसाद पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. सहाय्यक कृषी अधिकारी प्रसाद पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमास गुळसुंदे समूह ग्रामपंचायत परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
0 Comments