प्रात्यक्षिक प्रशिक्षणातून विद्यार्थी स्वावलंबी बनतील; देशाच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देतील – लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल(प्रतिनिधी): प्रात्यक्षिक प्रशिक्षण, उद्योगाभिमुख शिक्षण आणि दर्जेदार अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहतील तसेच देशाच्या आर्थिक विकासातही महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. कामोठे येथे रयत शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल एक्सलन्सच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.बदलत्या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या गरजा लक्षात घेऊन आणि उद्योगाभिमुख व्यावसायिक शिक्षणाद्वारे तरुणांना सक्षम करण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेने कामोठे येथे इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल एक्सलन्सची स्थापना केली आहे. येत्या ऑगस्ट २०२६ पासून येथे विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना जागतिक रोजगाराच्या संधींसाठी सक्षम बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.या संस्थेमध्ये लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स (BFSI), परदेशी भाषा तसेच रिटेल मॅनेजमेंट यांसारख्या उच्च रोजगारक्षम क्षेत्रांतील अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला असून, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा आणि अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळणार आहे.संस्थेचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. शुभदा नायक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टे, ध्येय आणि भविष्यातील वाटचालीची माहिती दिली.यावेळी युएसडीसी टेक्नॉलॉजीचे संचालक हुसेन हाजिते, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, रायगड विभागाचे विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कामोठेच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षणक्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments