रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पनवेल (प्रतिनिधी):शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ मे व १ जून रोजी कळंबोली येथे विविध सामाजिक, आरोग्य व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार, आरोग्य सेवा आणि आध्यात्मिक प्रबोधनाचा संगम असलेल्या या उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक तन्मय रामदास शेवाळे यांनी केले आहे.वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांची सुरुवात रविवारी, दि. ३१ मे रोजी भव्य रोजगार व मोफत कोर्सेस मेळाव्याने होणार आहे. हा मेळावा सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत सुधागड शाळा हॉल, सेक्टर-५, कळंबोली येथे आयोजित करण्यात आला आहे. 
या मेळाव्यात युवक-युवतींना विविध रोजगाराच्या संधींबरोबरच मोफत कौशल्यविकास अभ्यासक्रमांची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्यानंतर सोमवारी, दि. १ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, सेक्टर-३ ई, कळंबोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यक आरोग्यविषयक सल्ला व मार्गदर्शनही दिले जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सुधागड शाळा मैदान (जुनी इमारत), सेक्टर-३ ई, कळंबोली येथे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली आहे.रामदास शेवाळे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या विविध सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक तन्मय रामदास शेवाळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments