नवी मुंबई : सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात बांधकाम क्षेत्र विक्री व भागीदारी व्यवहारामध्ये मोठ्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल ५१ हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्रासंदर्भात ही फसवणूक झाल्याचा आरोप असून, संबंधित मालमत्तेची किंमत सुमारे २ कोटी ७२ लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, फिर्यादी विजय सतारामदास लखानी (वय ६८) हे बिल्डर व डेव्हलपर व्यवसायात कार्यरत असून, ते वाशी येथील रहिवासी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हिंदुस्तान बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीमार्फत नवी मुंबई परिसरात विविध बांधकाम प्रकल्प राबविण्यात आले होते. या प्रकल्पांमधील बांधकाम क्षेत्र विक्री, भागीदारी करार व आर्थिक व्यवहारांमध्ये आरोपींनी संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.सदर प्रकरणात बाबूलाल शाह, पृथ्वीराज गोलेचा, पारसमल गोलेचा, पियुष मेहता, विक्रम मोटीलाल मेहता आणि करण सल्वलकर या सहा जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८(४), ३१६(२) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार, सन २००५ पासून संबंधित बांधकाम क्षेत्र व्यवहार सुरू होते. आरोपींनी फिर्यादींना विश्वासात घेऊन विविध दस्तऐवज, करारनामे आणि भागीदारी व्यवहार केले.
त्यानंतर संबंधित बांधकाम क्षेत्राच्या विक्री, मालकी हक्क व हस्तांतरणाबाबत वाद निर्माण झाला. आरोपींनी परस्पर संगनमत करून फिर्यादींच्या मालकीच्या बांधकाम क्षेत्रावर स्वतःचा दावा सांगत आर्थिक लाभ मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, संबंधित प्रकरणात २०,४०० चौरस फूट, १५,३०० चौरस फूट तसेच इतर बांधकाम क्षेत्र विक्रीसंदर्भात वेगवेगळे व्यवहार झाले होते. मात्र, या व्यवहारांमध्ये आर्थिक व्यवहार पूर्ण करूनही फिर्यादींना योग्य हक्क व लाभ मिळाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी बनावट व्यवहार, चुकीची माहिती व दबावतंत्र वापरून फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी देखील न्यायालयीन व पोलीस स्तरावर तक्रारी व चौकशी सुरू असल्याचे समोर आले आहे. अखेर तक्रारदारांच्या निवेदनानंतर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप विठ्ठल माने हे करीत आहेत.
0 Comments