रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या डॉक्टर महिलेने जिद्दीने मातृत्व जिंकले

नवी मुंबई, प्रतिनिधी : अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या गर्भधारणेचा यशस्वी सामना करत रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या एका डॉक्टर महिलेने खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ३.२ किलो वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला. प्रगत वैद्यकीय उपचार आणि तज्ज्ञांच्या समन्वयामुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असून, हा प्रसंग जिद्द आणि आधुनिक आरोग्यसेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.रुग्ण डॉ. रोशन शेख यांनी यापूर्वी एका भीषण रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले होते. मात्र त्यांनी हार न मानता कृत्रिम पायांच्या सहाय्याने पुन्हा उभं राहत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्य सुरू ठेवलं. त्यांच्या मातृत्वाचा प्रवास संघर्षमय असला तरी तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.गर्भधारणेदरम्यान डॉ. शेख यांना गर्भावस्थेतील मधुमेहाचे निदान झाले होते. कृत्रिम पायांमुळे हालचालींमध्ये अडचणी येत असतानाही त्यांनी नियमित तपासणी, योग्य आहार आणि वैद्यकीय सल्ल्याचे काटेकोर पालन केले. कुटुंबाचा पाठिंबा आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांनी सर्व आव्हानांवर मात केली.प्रसूती तज्ञ डॉ. स्वप्ना दहे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनुरंजिता पल्लवी आणि डॉ. संतोष जयभाये यांच्या टीमने ही गुंतागुंतीची गर्भधारणा यशस्वीपणे हाताळली. आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी नियोजित सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली.
डॉ. अनुरंजिता पल्लवी यांनी सांगितले की, रुग्णाची शारीरिक स्थिती आणि गर्भावस्थेतील मधुमेह यामुळे हे प्रकरण अधिक आव्हानात्मक होते. त्यामुळे नियमित वैद्यकीय देखरेख आणि आहार नियंत्रण अत्यंत आवश्यक होते.डॉ. स्वप्ना दहे यांनी सांगितले की, संपूर्ण गर्भावस्थेत रुग्णाने सकारात्मकता आणि धैर्य दाखवले. प्रसूतीनंतर काही दिवसांतच फिजिओथेरपीच्या मदतीने त्या पुन्हा हालचाल करू लागल्या, ज्यामुळे त्यांचा पुनर्वसनाचा प्रवास अधिक वेगाने झाला.प्रसूतीनंतर चार दिवसांनी आई आणि बाळाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.आपला अनुभव सांगताना डॉ. रोशन शेख म्हणाल्या, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण पण सुंदर प्रवास होता. भीती आणि अनिश्चितता असूनही मी आशा सोडली नाही. आज माझ्या मुलीला हातात घेतल्यानंतर सर्व संघर्ष सार्थकी लागल्यासारखे वाटते.”मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख संदीप जोशी यांनी सांगितले की, हे प्रकरण मानवी जिद्द आणि आधुनिक, संवेदनशील आरोग्यसेवेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. उच्च-जोखमीच्या गर्भधारणांमध्ये वैद्यकीय कौशल्यासोबत भावनिक आधार आणि टीमवर्कही तितकेच महत्त्वाचे असते.

Post a Comment

0 Comments