पनवेल (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील पनवेल व तळोजा एमआयडीसी परिसरात युवकांच्या संघटनात्मक चळवळीला नवे वळण देणाऱ्या ‘भगवा टायगर ग्रुप’ या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामागे स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या रामदास पाटील यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे समोर येत आहे.सामाजिक, सांस्कृतिक आणि युवकांच्या विविध प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेण्याच्या उद्देशाने या संघटनेची उभारणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. पनवेल आणि रायगड परिसरातील युवकांना एकत्र आणून त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे, तसेच स्थानिक समस्यांवर प्रभावीपणे आवाज उठवणे हा या संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे संस्थापकांनी स्पष्ट केले.
विशेषतः औद्योगिक परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळोजा एमआयडीसी भागात रोजगार, स्थानिक सुविधा, तसेच युवकांच्या संधी या मुद्द्यांवर सातत्याने चर्चा होत असताना, अशा संघटनेच्या स्थापनेमुळे या प्रश्नांना अधिक संघटित पद्धतीने हाताळले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिलेली ही संघटना भविष्यात सामाजिक उपक्रम, युवक मेळावे, तसेच विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या उपक्रमाकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
0 Comments