महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लवकरच व्यापक बदल होण्याची शक्यता आहे. विधानसभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सुधारणांची ठोस मागणी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनांची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ३० खाटांचा निकष शिथिल करणे, कर्करोग उपचारांची पॅकेजेस अधिक व्यापक करणे आणि रुग्णांच्या हितासाठी कठोर नियम लागू करण्याचे संकेत दिले.चर्चेदरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे जनआरोग्य योजनेचा विस्तार सर्व नागरिकांसाठी खुला केल्याबद्दल अभिनंदन केले. मात्र, आमदार प्रशांत ठाकूर यांनी योजना सर्वांसाठी खुली झाली असली तरी पुरेशी संलग्न रुग्णालये नसल्याने नागरिकांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात सुमारे २४० रुग्णालये असतानाही केवळ ४० रुग्णालये योजनेशी संलग्न असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत एकही संलग्न रुग्णालय नसल्याने रुग्णांना मुंबई, नवी मुंबई किंवा पुण्याकडे जावे लागत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.योजनेत सहभागी होण्यासाठी असलेला ३० खाटांचा निकष ग्रामीण व निमशहरी भागातील अनेक गुणवत्तापूर्ण लहान रुग्णालयांसाठी अडसर ठरत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले. या निकषात शिथिलता आणण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.योजनेअंतर्गत पात्र रुग्णालयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचा मुद्दाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडला. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणी संलग्न रुग्णालयांची यादी प्रदर्शित करण्याची मागणी त्यांनी केली.याशिवाय, काही रुग्णालयांकडून योजनेतील रुग्णांकडून नियमबाह्य अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिंता व्यक्त केली. त्यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बॉम्बे नर्सिंग ॲक्ट, महाराष्ट्र नर्सिंग ॲक्ट आणि प्रस्तावित क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट अंतर्गत कठोर नियम लागू करून मनमानी बिलिंग करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.कर्करोग उपचारांच्या वाढत्या खर्चाचा विचार करून पीईटी स्कॅन (PET Scan), केमोथेरपी, रेडिएशन आणि आवश्यक शस्त्रक्रियांचा समावेश उपचार पॅकेजमध्ये करण्याची मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. त्यावर सरकारने कर्करोगासह न्यूरो आणि ऑर्थोपेडिक उपचारांची पॅकेजेस अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले.याशिवाय, कर्करोग क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्था आणि ‘कॅन्सर मित्र’ यांना धोरण प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची सूचनाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. प्रत्यक्ष रुग्णांचे अनुभव धोरणनिर्मितीसाठी उपयुक्त ठरतील, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.विधानसभेतील या चर्चेमुळे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक लाभदायी करण्याच्या दिशेने राज्य सरकार सकारात्मक पावले उचलणार असल्याचे स्पष्ट झाले असून, रायगड, पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना या बदलांचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments