महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय; पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग

प्रतिनिधी (पनवेल) : पनवेल महानगरपालिका हद्दीत सामान्य कर्करोगांचे पूर्वतपासणी, लवकर निदान आणि प्रतिबंध यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांच्यात विशेष करार करण्यात आला असून, या कराराच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा बळकट करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि समुदाय स्तरावर कर्करोग तपासणी सेवा सक्षम करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या उपक्रमाअंतर्गत टाटा मेमोरियल सेंटर (प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी सर्व्हिसेस, खोपोली) आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “सामान्य कर्करोगांचे प्रतिबंध, नियंत्रण व लवकर निदान” या विषयावर एएनएम व स्टाफ नर्सेससाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.ही कार्यशाळा २५ व २७ मार्च तसेच १६ व १७ एप्रिल २०२६ रोजी सिडको समाज केंद्र, कामोठे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत एकूण १२० नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यशाळेमध्ये स्तन, गर्भाशय मुख (सर्व्हिकल) आणि तोंडाच्या (ओरल) कर्करोगाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये कर्करोगाचे प्रमाण, जोखमीचे घटक, लक्षणे, तपासणी पद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाय यांचा समावेश होता. तसेच एचपीव्ही डीएनए चाचणी, पॅप स्मीअर आणि VIA तपासणी यांचे प्रात्यक्षिक सत्रही घेण्यात आले. स्तन स्वयं-परीक्षण, तोंडाच्या कर्करोग तपासणी, तंबाखू निर्मूलन समुपदेशन आणि जनजागृती यावर विशेष भर देण्यात आला.कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांनी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्यासह भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आशा सेविका आणि नर्सेस यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
कोट :
“महिलांचे आरोग्य हे समाजाच्या सुदृढ भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, लवकर निदान आणि जनजागृती यावर आधारित उपक्रम प्रभावीपणे राबवत आहोत. प्रत्येक महिलेला वेळेवर तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे,” असे ममता प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.
तसेच केंद्र व राज्य सरकार महिला आरोग्य आणि सक्षमीकरणावर विशेष भर देत असून, त्याच धोरणाच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका प्रभावीपणे कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यापूर्वी आशा कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, आता प्रशिक्षित नर्सेस आणि आशा सेविकांच्या संयुक्त प्रयत्नातून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) स्तरावर कर्करोग तपासणी शिबिरे अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.पनवेल महानगरपालिका नागरिकांना आवाहन करते की, या तपासणी शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घ्यावी. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महानगरपालिका कटिबद्ध राहणार आहे.

Post a Comment

0 Comments