अमरावती सायबर ब्लॅकमेल प्रकरण; शिल्पा पाठक ठाकूर, यशोमती ठाकूर आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

अमरावती जिल्ह्यात उघडकीस आलेल्या अयान अहमद उर्फ तनवीर प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे खासगी व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.शिल्पा पाठक ठाकूर (महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी) यांनी प्रशासनावर टीका करत डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वाढत्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा आरोप केला आहे. तातडीने विशेष तपास पथकाद्वारे जलद चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. 
दरम्यान, काँग्रेस नेत्या तसेच माजी मंत्री (महाराष्ट्र राज्य) यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. धर्मवादाच्या चौकटीत अडकून न पडता पोलिसांनी आणि गृहमंत्रालयाने सायबर सेल अधिक सक्षम करून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. फक्त एकाच ठिकाणी कारवाई न करता संबंधित सर्व आरोपी, त्यांच्या सहकाऱ्यांवर आणि एजंटांवरही कठोर पावले उचलली जावीत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, संबंधित आरोपींच्या मालमत्तांवर कारवाई करताना दुजाभाव होता कामा नये. ज्या घरांवर कारवाई सुरू आहे, त्याचप्रमाणे इतर संशयितांच्या मालमत्तांवरही कारवाई व्हावी. प्रकरणाशी संबंधित फरार व्यक्तींना शोधून अटक करावी आणि त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, असे त्यांनी नमूद केले. भरतवाडा आणि नाशिकमधील संबंधित प्रकरणांचीही सखोल चौकशी करून सर्व दोषींना शिक्षा मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलीस तपासात आतापर्यंत मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध बीएनएस, पोक्सो आणि आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.या संपूर्ण घटनेमुळे डिजिटल माध्यमांच्या सुरक्षित वापराबाबत व्यापक चर्चा सुरू झाली असून, नागरिकांकडून कठोर आणि जलद कारवाईची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments