पनवेल (प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीतील अजरामर महाकाव्ये असलेल्या रामायण आणि महाभारतातील नायिकांच्या अंतर्मनाचा वेध घेणारा 'गूज मनीचे' हा संशोधनाधारीत आणि प्रयोगशील नाट्यप्रयोग बुधवारी पनवेलमध्ये उत्साहात संपन्न झाला. नादकला थिएटर अँड फिल्म्स निर्मित या अभिनव नाटकाचा शुभारंभ आणि पहिला प्रयोग आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नाट्यप्रयोगाची मूळ संकल्पना डॉक्टर मेधा किरीट यांची असून, लेखन व दिग्दर्शन साक्षी परांजपे यांनी केले आहे, तर प्रिया सावंत या प्रयोगाच्या सहनिर्मात्या आहेत. रामायण आणि महाभारतातील चिरंतन नायिकांचे विचार, त्यांच्या भावना आणि त्यांचे अंतर्मन आजच्या काळाशी सुसंगत पद्धतीने या प्रयोगातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले. हा प्रयोग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, एक सखोल संशोधनावर आधारित नाट्यकृती असल्याने प्रयोगापूर्वीच रसिक प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. प्रत्यक्षात प्रयोगादरम्यान नायिकांच्या व्यक्त होणाऱ्या भावनांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या प्रयोगावेळी माजी खासदार किरीट सोमैया, मेधा किरीट सोमैया, प्रिया सावंत, साक्षी परांजपे, अभिषेक पटवर्धन, शामनाथ पुंडे, चिन्मय समेळ, वैभव बुवा, आदित्य उपाध्ये, निखील गोरे, सुनीता खरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यशस्वी आयोजनासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेश ठाकूर यांचे आयोजकांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
0 Comments