पनवेल (प्रतिनिधी): समाजातील अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवत पत्रकारिता आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या पत्रकार रुपालीताई शिंदे यांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. आदर्श शैक्षणिक समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिनेते निलेश साबळे यांच्या हस्ते त्यांना “पत्रकारितेतील लेडी सिंघम” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पत्रकारिता क्षेत्रात कार्य करताना महिलांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. कुटुंब, मुले आणि घराची जबाबदारी सांभाळत समाजातील प्रश्न मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि सतत बदलत असलेल्या माध्यमविश्वात आपले स्थान निर्माण करणे हे महिलांसाठी मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीतही अनेक महिला पत्रकारांनी आपल्या कार्याने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.पनवेल परिसरात निर्भीड आणि रोखठोक पत्रकारितेसाठी ओळखल्या जाणाऱ्या रुपालीताई शिंदे यांना “लेडी सिंघम” म्हणून ओळखले जाते. पत्रकारिता करताना त्यांनी समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत महिलांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आहे. त्यांच्या कार्यामुळे पनवेल व रायगड परिसरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.पत्रकारिता व समाजसेवा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत आदर्श शैक्षणिक समूहाने महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला पनवेल परिसरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments