नवी मुंबई ( प्रतिनिधि): बैठी जीवनशैली, दीर्घकाळ संगणकावर काम, चुकीची शारीरिक स्थिती आणि वाढता स्क्रीन टाइम यामुळे मणक्याशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नुकतेच कॉम्प्रिहेन्सिव्ह स्पाइन क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये पाठदुखी, स्लिप डिस्क, मानेचे दुखणे, पोश्चरशी संबंधित समस्या आणि हालचालींमध्ये अडथळे येणाऱ्या रुग्णांसाठी तज्ञांकडून तपासणी, प्रगत निदान आणि वैयक्तिक उपचार योजना उपलब्ध करून दिली जाणार आहे.आधुनिक जीवनशैलीमुळे दीर्घकाळ बसून काम करणे, व्यायामाचा अभाव आणि चुकीची शारीरिक स्थिती यामुळे मणक्याच्या समस्या आता तरुणांमध्येही वाढताना दिसत आहेत. अनेकांना सतत पाठदुखी, मान कडक होणे, हात-पाय सुन्न पडणे, मुंग्या येणे किंवा दैनंदिन कामे करताना त्रास जाणवतो. वेळीच उपचार न घेतल्यास मज्जातंतूंवर दाब येऊन हालचालींवर परिणाम होऊ शकतो आणि गंभीर विकार निर्माण होण्याचा धोका वाढतो. या स्पाइन क्लिनिकमध्ये सखोल वैद्यकीय तपासणी आणि प्रगत निदान चाचण्यांद्वारे वेदनेचे मूळ कारण शोधले जाते. त्यानुसार औषधोपचार, फिजिओथेरपी, शारीरिक स्थिती सुधारणा, जीवनशैलीतील बदल आणि वेदना व्यवस्थापन यासह आवश्यक असल्यास प्रगत शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले जातात.ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक डॉ. प्रमोद भोर म्हणाले की, बैठी जीवनशैली, चुकीची शारीरिक स्थिती आणि व्यायामाचा अभाव यामुळे सर्व वयोगटात मणक्याच्या समस्या वाढत आहेत. सुरुवातीला पाठदुखी, कडकपणा किंवा मुंग्या येणे यासारखी लक्षणे दुर्लक्षित केली जातात, परंतु नंतर समस्या गंभीर होऊ शकते. या स्पाइन क्लिनिकच्या माध्यमातून वेळीच निदान, वैयक्तिक उपचार आणि प्रतिबंधात्मक काळजी यावर विशेष भर दिला जात आहे.या क्लिनिकमध्ये दीर्घकालीन पाठदुखी, मानदुखी, स्लिप डिस्क, डिजनरेटिव्ह स्पाइन डिसऑर्डर, स्कोलियोसिस, मेटास्टॅटिक स्पाइन कॉम्प्रेशन, फ्रॅक्चर आणि इतर मणक्याच्या विकारांवर बहुविद्याशाखीय पद्धतीने उपचार केले जाणार आहेत. ऑर्थोपेडिक तज्ञ, स्पाइन सर्जन, फिजिओथेरपिस्ट आणि पुनर्वसन तज्ञांची संयुक्त टीम रुग्णांसाठी उपचार योजना तयार करते. तसेच एंडोस्कोपिक आणि मिनिमली इनवेसिव्ह स्पाइन सर्जरीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलद पुनर्प्राप्तीवर भर दिला जाणार आहे.ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन डॉ. अरविंद वाटकर यांनी सांगितले की, मणक्याचे अनेक आजार वेळेत ओळखल्यास शस्त्रक्रियेविना नियंत्रणात आणता येतात. योग्य निदान, प्रभावी फिजिओथेरपी, योग्य शारीरिक स्थितीबाबत मार्गदर्शन आणि जीवनशैलीत बदल यावर भर देऊन रुग्णांना दैनंदिन जीवनात सुरक्षितपणे परत आणण्याचे उद्दिष्ट आहे. मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे केंद्र प्रमुख संदीप जोशी म्हणाले की, मणक्याच्या विकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून तज्ञांच्या मार्गदर्शनाखालील विशेष उपचारांची गरज आहे. या स्पाइन क्लिनिकद्वारे रुग्णांना अचूक, प्रगत आणि सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
0 Comments