पनवेल (प्रतिनिधी) :जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची एनसीसी कॅडेट गोल्डन सीनियर अंडर ऑफिसर वेदिका प्रमोद महाबरे यांची दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड झाली होती. वेदिका महाबरे हि एस.वाय.बी.ए.च्या विद्यार्थिनी असून, त्यांनी अत्यंत कठोर व सातत्यपूर्ण प्रशिक्षणातून यशस्वी वाटचाल केली आहे. त्यांनी सलग चार वार्षिक प्रशिक्षण शिबिरे पूर्ण केली असून, दोन प्री-इंटर ग्रुप कॅम्पसाठी निवड होऊन पूर्ण निष्ठा, शिस्त आणि समर्पणाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.याच उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांची इंटर ग्रुप सिलेक्शन कॅम्पसाठी निवड झाली, जो राज्यस्तरीय स्तरावरील मानाचा कॅम्प आहे. पुढे, त्यांची रिपब्लिक डे परेड कॅम्प २०२६ साठी निवड झाली असून, त्यांनी राजपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात प्लाटून कमांडर म्हणून गौरवास्पद सहभाग नोंदविला होता. हे राज्यासाठी, बटालियनसाठी तसेच चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी युनिट व पनवेल परिसरासाठी अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद बाब आहे. गोल्डन सीनियर अंडर ऑफिसर वेदिका महाबरे यांच्या या यशामागे त्यांच्या माता-पिता, महाविद्यालयाचे प्राचार्य, असोसिएट एनसीसी ऑफिसर, केअर टेकिंग ऑफिसर तसेच सर्व शिक्षकवर्गाचे मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले आहे. ३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, मुंबई ‘A’ ग्रुप अंतर्गत वेदिका महाबरे यांनी उत्कृष्ट शिस्त, प्रभावी नेतृत्वगुण, उत्तम शारीरिक तंदुरुस्ती व राष्ट्रीय सेवेच्या भावनेच्या जोरावर ही मानाची निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण परिसरात आनंद व अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील, एएनओ प्रा. निलीमा तिदार, सीटीओ प्रा. सागर एस. व्यवहारे तसेच आयक्यूएसी समन्वयक प्रा. बी. डी. आघाव यांनी वेदिका यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्याची संधी मिळणे हे प्रत्येक एनसीसी कॅडेटसाठी अत्यंत गौरवाची बाब मानली जाते. वेदिका महाबरे यांच्या या यशामुळे महाविद्यालय व महाराष्ट्र एनसीसी युनिटचा मान अधिक उंचावला आहे.
0 Comments