उलवे, ता. ४ : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि शेलघरचे सुपुत्र महेंद्रशेठ घरत यांच्या संकल्पनेतून भव्य-दिव्य साई मंदिर पनवेल तालुक्यातील शेलघरमध्ये साकार होत आहे. या मंदिरासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मंदिराचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच सुसज्ज आणि भव्यदिव्य साई मंदिर पूर्ण होईल, असा आशावाद महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केला. १९९२ पासून म्हणजे ३० ते ३५ वर्षांपूर्वीचे साई मंदिर शेलघरमध्ये होते. ते त्यावेळी पाच लाख रुपये खर्च करून बांधले होते. त्या मंदिरासाठी रामशेठ ठाकूर यांनी अडीच लाख रुपये त्यावेळी मदत केली होती, पण ते मंदिर मोडकळीस आले होते. त्यामुळे त्याच जागेवर शेलघरमध्ये सुसज्ज साई मंदिर उभारू या, अशी कल्पना महेंद्रशेठ घरत यांनी ग्रामस्थांसमोर मांडली. यासाठी साई समस्थान सेवाभावी संस्था ही नोंदणीकृत केली आहे. अरुणशेठ भगत हे अध्यक्ष, तर महेंद्रशेठ घरत हे सचिव आहेत. या दोघांनीही आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेऊन ग्रामस्थांमध्ये समन्वयाचा सेतू भक्कम बांधला आहे. त्यामुळे साई मंदिर प्रत्यक्षात साकार होत आहे.माजी खासदार रामशेठ ठाकूर हे शेलघरचे जावई! त्यामुळे रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच शेलघर गावावर राजकीय आणि आर्थिक सहकार्याबाबत वरदहस्त राहिला आहे. त्यामुळेच या भव्य-दिव्य साई मंदिरासाठी त्यांनी चक्क तीन कोटी रुपयांचे दान केले आहे आणि बांधकामासाठी आणखी कमी पडले तर मी आहेच, त्यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या साई मंदिरासाठी काही कमी पडणार नाही, असा आशावाद महेंद्रशेठ घरत यांच्याकडे त्यांनी व्यक्त केलेला आहे.नियोजित साई मंदिरात दिवंगत जनार्दन आत्माराम भगत आणि शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या नावाने दोन भव्य सभागृह असणार आहेत. तसेच साईबाबा, गणपती बाप्पा आणि शिवशंकर यांच्या मूर्ती असणार आहेत. पुजाऱ्यांसाठी निवास आणि किमान ४० गाड्या पार्क होतील,अशी पार्किंग व्यवस्थाही आहे.
नियोजित आणि सुसज्ज शेलघर गाव उभारण्यासाठी महेंद्रशेठ घरत यांचा सिंहाचा वाटा आहे, तर शेलघरमध्ये भव्यदिव्य साई मंदिर उभारण्यासाठी शेलघरचा जावई या नात्याने माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. रामशेठ ठाकूर आणि महेंद्रशेठ घरत यांचे सध्या राजकीय प्रवाह वेगळे असले तरी सामाजिक बांधिलकी जपण्यात या दोघांचा हात सध्या कुणीही धरू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. रामशेठ ठाकूर म्हणतात, "माझा वारसा महेंद्रशेठ चालवतोय, तर महेंद्रशेठ म्हणतात, मी रामशेठ ठाकूर यांना फॉलो करतो." यात बरेच काही आले.महाराष्ट्रात अनेक गावे आहेत, पण शेलघरसारखे बंगल्यांचे आणि सुसज्ज, स्वच्छ, सुंदर गाव कुठेही सापडणार नाही, हे अभिमानाने महेंद्रशेठ घरत सांगतात. गावात एसी सुसज्ज सभागृह, एसी जिम. हे सारे ग्रामस्थांसाठी विनामूल्य आहे. सिडकोच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी खंबीर भूमिका घेऊन सुनियोजित गाव विकसित करण्यात महेंद्रशेठ घरत यांना यश आले आहे.शेलघरच्या विकासासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतलेत, राजकीय चपला बाहेर ठेवल्या, विकासाबाबत ग्रामस्थांत हेवे-दावे होणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. ते बहुतांश वेळा आंतरराष्ट्रीय कामगार नेते असल्याने परदेशात असतात, पण ते जगात कुठेही गेले तरी त्यांचे लक्ष आपल्या गावावर सदोदित असते. 'घार हिंडे आकाशी, पण तिचे लक्ष पिल्लांपाशी,' अशी अवस्था महेंद्रशेठ घरत यांची शेलघरबाबत झालेली असते.महेंद्रशेठ घरत म्हणतात, एकेकाळी आमच्या गावात, कुडाची घरे होती, कालांतराने कच्च्या विटा-सिमेंटची घरे झाली, आता तर शेलघर हे महाराष्ट्रात बंगल्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, मग गावचे जुने साई मंदिरही भव्यदिव्यच हवे, बंगल्यांच्या वर त्याचा कळस असावा, हे स्वप्न पाहिले आणि लवकरच ते साकार होणार आहे.
0 Comments