प्रतिनिधी (पनवेल) : पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कळंबोली येथील काळभैरव सभागृहात विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानातील शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन उपमहापौर प्रमिला रवीनाथ पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे आणि प्रभाग समिती ‘अ’चे सभापती रवींद्र भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी महापालिका सदस्य सरस्वती काथारा, मोनिका महानवर, योगिता फडके, मनाली ठाकूर आणि बायजा बारगजे उपस्थित होत्या.नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात परिसरातील सुमारे ४८ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरास मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. मनिषा चांडक, डॉ. सुरेश पंडित, डॉ. भक्तराज भोईटे यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.दरम्यान, सेवा संकल्प अभियानांतर्गत पुढील रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑक्टोबर रोजी प्रभाग ‘क’च्या प्रभाग समिती कार्यालय, कामोठे येथे, तर १० ऑक्टोबर रोजी प्रभाग ‘ब’च्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, सेक्टर १५, खारघर येथे रक्तदान शिबिर होणार आहे.
0 Comments