खोपोलीत भाजप व विक्रम साबळे फाऊंडेशनतर्फे भव्य दहीहंडी उत्सव

खोपोली / (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी खोपोली शहर तसेच विक्रम साबळे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी गोविंदा पथकांना आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून, त्यामुळे खोपोली परिसरातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकाला तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच पुरुष गटातील पहिल्या सहा थरांच्या सलामीसाठी ४ हजार रुपयांचे, तर महिला गटातील पहिल्या पाच थरांच्या सलामीसाठी ४ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन भारतीय जनता पार्टी खोपोली मंडळ तसेच विक्रम साबळे फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खोपोलीचे उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत साबळे, माजी नगरसेवक अविनाश रामकृष्ण तावडे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विक्रम साबळे फाऊंडेशनचे सदस्य मेहनत घेत आहेत.दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवात गोविंदांचा थरार, ढोल-ताशांचा गजर, संगीत, जल्लोष आणि नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळणार आहे. आकर्षक बक्षिसांमुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाची रंगत आणखी वाढणार असून, खोपोली परिसरात आतापासूनच उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

आकर्षक पारितोषिकांची लयलूट

- प्रथम पारितोषिक – विजेता गोविंदा पथक : ₹१,११,१११/-
- पुरुष गट – पहिल्या सहा थरांची सलामी : ₹४,०००/-
- महिला गट – पहिल्या पाच थरांची सलामी : ₹४,०००/-

गोविंदांच्या थरारासोबत आकर्षक बक्षिसांची लयलूट; खोपोलीत दहीहंडीचा जल्लोष रंगणार!

Post a Comment

0 Comments