नेरुळ एल.पी. परिसरातील धोकादायक वीजवाहिन्यांची तातडीने तपासणी करा; शिवसेनेची महावितरणकडे मागणी

प्रतिनिधी/ (प्रेरणा गावंड):नेरुळ एल.पी. परिसरात तुटलेल्या विद्युत वाहिनीमुळे दोन विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागल्याच्या गंभीर घटनेची दखल घेत शिवसेना आगरी-कोळी समाजाचे राज्य समन्वयक नामदे भगत यांनी महावितरण विभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.यासंदर्भात कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग, नेरुळ यांना निवेदन देण्यात आले असून, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नेरुळ एल.पी. परिसरात तुटलेल्या वीजवाहिनीमुळे दोन विद्यार्थ्यांना विजेचा धक्का बसला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी भविष्यात अशा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे नेरुळ व परिसरातील सर्व विद्युत वाहिन्यांची तातडीने तपासणी करून जीर्ण, सैल किंवा धोकादायक वायरिंग बदलण्यात यावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनाची प्रत नवी मुंबई महापालिका आयुक्त तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनाही पाठविण्यात आली असून, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments