भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी रुपेश धुमाळ यांचा पुढाकार; नवी मुंबई विमानतळावर ‘भारत टॅक्सी सेवा’चा मार्ग मोकळा

(प्रतिनिधी /साबीर शेख) : लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि स्थानिक रिक्षाचालकांना टॅक्सी व्यवसायात मालकी हक्क मिळावा, या उद्देशाने भूमिपुत्रांचे नेते रुपेश धुमाळ यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.याच अनुषंगाने बुधवारी मंत्रालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत टॅक्सी सेवा’ सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अदानी चे जीत अदानी, उरणचे आमदार महेश बालदी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, ‘भारत टॅक्सी सेवा’ समूहाचे प्रतिनिधी तसेच विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील स्थानिक युवक, रिक्षाचालक आणि भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विमानतळ सुरू झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत स्थानिकांना थेट सहभाग मिळावा, यासाठी ‘भारत टॅक्सी सेवा’ हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न सातत्याने मांडणारे रुपेश धुमाळ यांनी रिक्षाचालकांना केवळ चालक न ठेवता त्यांना टॅक्सी मालक बनविण्याची संकल्पना पुढे आणली आहे. त्यामुळे आर्थिक सक्षमीकरणासह स्थानिक कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बैठकीतील चर्चा अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून, लवकरच या संदर्भातील पुढील कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरातील हजारो भूमिपुत्र, युवक आणि रिक्षाचालकांच्या आशा अधिक बळावल्या आहेत.स्थानिकांच्या हक्काच्या रोजगारासाठी सातत्याने प्रयत्न करणारे रुपेश धुमाळ यांचे हे पाऊल भविष्यात भूमिपुत्रांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments