पनवेल (प्रतिनिधी):जागतिक स्तरावरील कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) जागतिक परिषदेसाठी ज्येष्ठ कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची भारतीय कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेने मिळालेला हा सन्मान कामगार चळवळीसाठी गौरवास्पद मानला जात आहे.१ ते १२ जून २०२६ या कालावधीत जिनिव्हा येथे होणाऱ्या या परिषदेसाठी Indian National Trade Union Congress (INTUC) तर्फे न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तसेच इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत यांची निवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, यापूर्वी २०१८ मध्येही त्यांना ILO च्या जागतिक परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे भारतीय कामगारांचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांना दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे.या परिषदेत विविध देशांतील कामगार मंत्री, उद्योग समूहांचे प्रतिनिधी, कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील सुमारे ९ हजार प्रतिनिधी सहभागी होत आहेत. जागतिक स्तरावरील कामगारांच्या समस्या, कामगार हक्क, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा, रोजगाराच्या संधी तसेच कामगार कल्याणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. भविष्यातील कामगार धोरणे व कायद्यांच्या निर्मितीसाठीही ही परिषद महत्त्वपूर्ण मानली जाते.कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य बाजूला ठेवत ३० मे रोजीच जिनिव्हासाठी प्रस्थान केले. कामगार संघटनांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची पुन्हा एकदा या प्रतिष्ठित परिषदेसाठी निवड करण्यात आल्याने कामगार क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणारे नेतृत्व म्हणून महेंद्रशेठ घरत यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे भारतीय कामगारांचा आवाज जागतिक व्यासपीठावर अधिक सक्षमपणे पोहोचेल, असा विश्वास विविध कामगार संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments