नवी मुंबईत मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्रौढ लसीकरण क्लिनिक

नवी मुंबई, (प्रतिनिधी) : प्रौढांमध्ये वाढत्या संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलने नवी मुंबईत विशेष प्रौढ लसीकरण क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून प्रौढांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जनजागृती करणे तसेच गंभीर संसर्गांपासून संरक्षणासाठी आवश्यक लसी सहज उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ फिजिशियन, डायबेटोलॉजिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. बादल शिवनारायण ताओरी, डॉ. श्रीराम नवाडे, डॉ. विजेता बागडे, डॉ. पूजा परधी आणि डॉ. प्रशांत डी. पुरकर उपस्थित होते.प्रौढ लसीकरणाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र वाढते वय, मधुमेह, सीओपीडी आणि इतर दीर्घकालीन आजारांमुळे न्यूमोनिया, इन्फ्लूएंझा, शिंगल्स यांसारख्या संसर्गांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर नव्याने सुरू करण्यात आलेले क्लिनिक प्रौढांसाठी आवश्यक लसींबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच वैयक्तिकृत लसीकरण योजना उपलब्ध करून देणार आहे.या क्लिनिकमध्ये न्यूमोकोकल, वार्षिक इन्फ्लूएंझा, टिटॅनस-डिप्थेरिया-पर्टुसिस (टीडीएपी), एचपीव्ही, शिंगल्स आणि हिपॅटायटीस-बी यांसह विविध लसी उपलब्ध आहेत. रुग्णांचे वय, वैद्यकीय इतिहास आणि जोखमीचे घटक लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.यावेळी बोलताना मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या महाराष्ट्र व कर्नाटक विभागाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल म्हणाले की, “प्रौढ लसीकरण क्लिनिक ही आरोग्यसेवेतील महत्त्वाची गरज असून या उपक्रमाद्वारे प्रौढांमध्ये लसीकरणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गंभीर संसर्ग आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांपासून संरक्षणासाठी अधिकाधिक नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा.”तर मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे केंद्र प्रमुख संदीप जोशी यांनी सांगितले की, “प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेची वाढती गरज लक्षात घेता प्रौढ लसीकरण क्लिनिकचा शुभारंभ हा निरोगी समाजाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. वेळेवर लसीकरण आणि जनजागृतीद्वारे गंभीर संसर्गाचा धोका कमी करून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे आमचे ध्येय आहे.”प्रौढ लसीकरणाला प्रोत्साहन देत, विशेषतः ५० ते ६० वर्षांवरील व्यक्ती तसेच आधीपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी हे क्लिनिक उपयुक्त ठरणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments