रस्ते सुरक्षा धोक्यात? नवकार व अष्ठे लॉजिस्टिक यार्डच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप

प्रतिनिधी (साबीर शेख):-स्थानिक नागरिकांना रोजगार मिळत असल्याचे कारण पुढे करत सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप नवकार व अष्ठे लॉजिस्टिक यार्डवर होत आहे. आधीच वाढत्या वाहतुकीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता या यार्डमधील अवजड वाहनांच्या कथित बेजबाबदार पार्किंगमुळे आणखी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.संबंधित परिसरातील सार्वजनिक रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रेलर आणि कंटेनर वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. अनेक वेळा दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि छोट्या वाहनांच्या चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, लॉजिस्टिक यार्डमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नाही परिणामी सार्वजनिक रस्त्यांचा पार्किंगसाठी वापर केला जात आहे. त्या नियोजनासाठी स्थानिक व निवृत्त झालेले अधिकारी नेमले गेले असून पत्रकारांना अरेरावी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे .पत्रकारिता करताना अश्याने घात पात करण्याचा कट रचला जाण्याची दाट शक्यता या निमित्ताने व्यक्त केली जात असल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सचिव साबीर शेख यांनी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती बद्दल लेखी स्वरूपात माहिती देऊन कायदेशीर नोंद घ्यावी यासाठी पत्र व्यवहार करत असल्याचे समजते. नागरिकांसाठी बांधण्यात आलेले रस्ते खासगी व्यावसायिकांच्या सोयीचे साधन बनल्याची असुरक्षित बाब एखाद्याच्या जीवास अंत करेल अशी चिंता या निमित्ताने व्यक्त होत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दैनंदिन प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे वाहतूक नियमांचे उघड उल्लंघन होत असतानाही संबंधित यंत्रणा आणि वाहतूक पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही स्थानिकांनी तर वाहतूक पोलिसांच्या कथित संरक्षणामुळेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. मात्र या आरोपांबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही भूमिका समोर आलेली नाही.रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत. एका बाजूला प्रशासन रस्ते सुरक्षेसाठी जनजागृती मोहीम राबवत असताना दुसऱ्या बाजूला सार्वजनिक रस्त्यांवर अवजड वाहनांचा कब्जा होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.नागरिकांनी जिल्हा प्रशासन, वाहतूक विभाग आणि RTO, पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग हटवावी, संबंधित लॉजिस्टिक यार्डच्या कारभाराची चौकशी करावी आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही स्थानिक संघटनांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments