देशातील महिलांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या “नारी शक्ती वंदन अधिनियम 2023” (नारी आरक्षण विधेयक) तातडीने लागू करण्याची मागणी अधिक तीव्र होताना दिसत आहे. दिल्लीत महिलांनी एकत्र येत आंदोलन करत पंतप्रधानांना पत्र पाठवून हे विधेयक कोणत्याही बदलांशिवाय त्वरित अंमलात आणण्याची मागणी केली. या आंदोलनात डॉ. शिल्पा पाठक ठाकूर यांची उपस्थिती आणि भूमिका विशेष ठळकपणे दिसून आली. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वा लाखे यांच्यासह विविध समाजघटकांतील महिलांचा या आंदोलनात सहभाग होता. मात्र, डॉ. शिल्पा पाठक ठाकूर यांनी महिलांच्या मागण्यांबाबत स्पष्ट भूमिका मांडत नारी आरक्षण विधेयक तातडीने लागू करण्याची गरज अधोरेखित केली.
डॉ. शिल्पा पाठक ठाकूर यांनी सांगितले की, या विधेयकात अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) महिलांसाठीही योग्य आरक्षणाची तरतूद असणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या मते, महिलांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.
देशभरातील महिलांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधानांच्या नवी दिल्ली येथील पत्त्यावर पत्र पाठवण्यात आले आहेत. डॉ. शिल्पा पाठक ठाकूर यांनी या माध्यमातून महिलांच्या अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.दरम्यान, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी देशभरात पोस्टकार्ड मोहिमेची घोषणा केली असून, या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेलाही डॉ. शिल्पा पाठक ठाकूर यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
या मोहिमेअंतर्गत देशभरातील महिला पंतप्रधानांना पोस्टकार्ड पाठवणार असून, “नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 लागू करा , आज करा, आत्ताच करा” अशी प्रमुख मागणी करण्यात येत आहे. डॉ. शिल्पा पाठक ठाकूर यांच्या मते, ही मोहिम महिलांचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, जुलै महिन्यात या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. डॉ. शिल्पा पाठक ठाकूर यांच्या सहभागामुळे या लढ्याला अधिक बळ मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
0 Comments