ऑपरेशन ‘सिंदूर’चे रियल हिरो नितीन ठाकूर यांचा भव्य सेवानिवृत्ती सोहळा

पेण( प्रतिनीधी ): पेण तालुक्यातील दीव गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्यातील ऑर्डिनरी नायब सुभेदार नितीन रामचंद्र ठाकूर हे तब्बल २४ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेनंतर सन्मानपूर्वक सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीच्या निमित्ताने वाशी खारेपाट विभागातर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.नितीन ठाकूर यांनी आपल्या सेवाकाळात देशाच्या सीमांवर अत्यंत कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावत अनेक धाडसी मोहिमांमध्ये सहभाग घेतला. संकटांना न घाबरता त्यांनी देशसेवा सर्वोच्च मानत आपले योगदान दिले. विशेषतः ‘ऑपरेशन सिंदूर’मधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना “रियल हिरो” म्हणून ओळख मिळाली असून, त्यांच्या धैर्य आणि समर्पणाची दखल सर्व स्तरांतून घेण्यात येत आहे.त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात गावकरी, माजी सैनिक, सहकारी जवान तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शिवतेज युवा फाउंडेशन रायगड संस्थेच्या वतीने शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता वाशी येथील श्री जगदंबा माता मंदिर येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर माजी सैनिक संघटनेच्या वतीने वाशी–वढाव–दिव अशी मिरवणूक काढण्यात येणार असून, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात त्यांचा सन्मान केला जाणार आहे. या मिरवणुकीदरम्यान नागरिकांना या वीर जवानाला प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यांच्या कार्याला मानवंदना देण्याची संधी मिळणार आहे.दीव येथील त्यांच्या जन्मगावी मुख्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून, त्या ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव करत विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि गावकऱ्यांसाठी हा क्षण अभिमानाचा आणि भावनिक ठरणार आहे.या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या या वीर जवानाला मानवंदना द्यावी, असे आवाहन शिवतेज युवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे.नितीन ठाकूर यांचा प्रेरणादायी प्रवास तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारा असून, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments