पोलादपूर ( प्रतिनिधी):तालुक्यातील प्रमुख नद्यांमध्ये सुरू असलेल्या अवैध रेती उपशामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेषतः सावित्री नदी तसेच ढवळी, कामथी, घोडनदी आणि चोळई या उपनद्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य पद्धतीने रेती काढली जात असल्याचे समोर आले आहे.स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा केला जात आहे. यामुळे नदीपात्राची खोली वाढत असून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलत आहे. परिणामी पूल, बंधारे तसेच नदीकाठच्या शेतीला गंभीर धोका निर्माण झाला आहे.पर्यावरण तज्ज्ञांनीही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली आहे. सततच्या उत्खननामुळे पर्यावरणीय हानी वाढत असून भविष्यात मोठे संकट ओढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. महसूल व पोलीस विभागाच्या निष्क्रियतेमुळे रेती माफियांना मोकळे रान मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक शिक्षा देण्यात यावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून अवैध उत्खननावर लगाम लावावा, अन्यथा भविष्यात मोठ्या पर्यावरणीय संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
0 Comments