पनवेलमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियम जनजागृतीचा अभिनव उपक्रम

पनवेल (प्रतिनिधी): पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने इंदुबाई वाजेकर इंग्लिश मीडियम स्कूल, पनवेल येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी एक अभिनव आणि प्रभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाढत्या अपघातांचे प्रमाण, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि त्यातून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्त रुजवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमात इयत्ता सहावी ते नववीच्या 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक भाषणांऐवजी संवादात्मक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. कवी मोहन काळे यांनी कविता आणि चारोळ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. त्यांच्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांवर विशेष प्रभाव पडला.
पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाहतूक नियमांविषयी सविस्तर माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पोलीस हवालदार युवराज येळे, लाळगे, पोलीस नाईक निकम आणि महिला पोलीस शिपाई तांडेल यांनीही सोप्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना माहिती दिली.कार्यक्रमादरम्यान शाळांना पुस्तक संचाचे वितरण करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापक पाटील मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन का आवश्यक आहे, याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या समारोपावेळी पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी विद्यार्थ्यांना ‘वाहतूक सुरक्षा नियमांची शपथ’ दिली. “वाहतूक नियम पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे,” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

Post a Comment

0 Comments