खारघर( प्रतिनिधि) : दिनांक २४ मार्च २०२६ रोजी खुटारी गावातील तळोजा जेल रोडलगत असलेल्या खुटारी तलावाजवळ नंदकुमार चंद्रकांत म्हात्रे यांच्या G+2 इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घराला मंगळवारी रात्री १०:०७ वाजता भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.अग्निशमन दलाने एक होज लाईन व होजरील होजच्या सहाय्याने घराच्या आत व बाहेरून पाण्याचा जोरदार मारा करत आग पूर्णपणे विझवली.
आग विझवल्यानंतर जळालेल्या कपाटातून मौल्यवान दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य सुरक्षितपणे बाहेर काढून घरमालकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच किचनमधील एकूण चार LPG सिलेंडर सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले, त्यामुळे संभाव्य मोठा स्फोट टळला.या आगीत घरातील कपाट, एसी, बेड, सोफा व इतर साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरमालकांच्या माहितीनुसार, काही दागिने तसेच अंदाजे १ ते दीड लाख रुपये रोख रक्कम आगीत जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी माहिती घरमालकांनी दिली. घरमालकांच्या पत्नी लीना नंदकुमार म्हात्रे या पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत.दरम्यान, या घटनेत सिडको अग्निशमन दलाचे अग्निशमन प्रणेता पी. के. दरेकर, यंत्रचालक एस. डी. निघुट तसेच फायरमन अजय वाघ, कैलास शिरसाठ, गणेश भोईर, जी. पी. गडगे, ए. एस. पाटील व गणेश सवर यांनी तत्परतेने काम करत आग नियंत्रणात आणली.
0 Comments