उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा जल्लोष; रायगड जिल्ह्याचा सक्षम संघ घडवण्यासाठी भव्य निवड चाचणी स्पर्धा

पनवेल (प्रतिनिधी) :लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्‌डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गटाची जिल्हा अजिंक्य पदाची निवड चाचणी कबड्‌डी स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शुक्रवार दि. २० ते रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उलवे नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जवळील रामशेठ ठाकूर मैदानात संपन्न होणार आहे. या स्पर्धेला छत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुनवीर, राज्य संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने नेहमीच ताकद दिली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रौढ महिला व पुरुष कबड्‌डी खेळाडूंकरिता ही स्पर्धा जिल्हा अजिंक्य पदासाठी निवड चाचणी स्वरूपात घेतली जाणार असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे विशेष महत्त्व आहे. या स्पर्धेकरिता जिल्ह्यातील १९८ पुरुष कबड्डी संघ आणि ३२ महिला संघांची नोंदणी झाली आहे. त्या अनुषंगाने २७७२ पुरुष आणि ४४८ महिला असे एकूण ३२२० खेळाडू सहभागी होणार आहेत. १९८ कबड्डी संघांमधून पुरुष संघातून संभाव्य २० खेळाडूंची तर ३२ महिला संघामधून संभाव्य २० महिला खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. आणि त्यातून निवड झालेला १४ पुरुष खेळाडूंचा संघ व १४ महिला खेळाडू संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे. या दोन्ही संघाचा मार्गदर्शक सराव शिबिरसुद्धा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे याच मैदानावर घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नुकताच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या १०० पंचांचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर पार पडले आहे.“रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गटाची जिल्हा अजिंक्य पद निवड चाचणी कबड्‌डी स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट आणि चुरशीच्या सामन्यांची क्रीडारसिकांना मेजवानी मिळणार आहे. त्याचबरोबरीने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा महिला व पुरुष सक्षम संघ मिळणार आहे, त्यामुळे हि निवड चाचणी स्पर्धा अत्यंत महत्वाची ठरणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जनरल सेक्रेटरी ॲड. आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून खेळाडू व प्रेक्षकांना या स्पर्धेचा लाभ व्हावा, यासाठी नियोजनाचा संपूर्ण आढावा खुद्द माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर घेत आहेत. 

Post a Comment

0 Comments